सोमवार, २४ मे, २०१०

फक्त सक्तीने काय होणार?


कालच आमच्या घरी थोड्याशा बांधकामानिमित्ताने आलेल्या कामगारांमध्ये एका लहान १३-१४ वर्षांचा मुलाला बघितल्यावर मी त्याचाशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला असता मला समजले की,त्या मुलाने चार वर्षांपूर्वी पाचवीत असताना शाळा सोडली..... आणि तो सध्या बांधकामाच्या ठिकाणी वाळू/खडी वाहण्याचे काम करतो.लगेच मला आठवले की नुकताच भारत सरकारने शिक्षण सक्तीचा कायदा पास केला आहे आणि मनात विचार आला कदाचित उद्याही हीच परिस्थिती असली तर काय उपयोग होणार या कायद्याचा?
आज जरी बालमजूरांना कामावर ठेवणे गुन्हा असले तरी आपण हॉटेल,दुकाने,बांधकामे अशा सर्वच ठिकाणी बालमजूर राबताना सर्रासपणे दिसतात.इतकेच काय तर अगदी पोलीस स्टेशनसमोर परिसरात देखील असेच दृश्ये असतात.यावर विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की नुसते कायदे करून काही होत नाही.आपणास लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावला पहिजे.ज्यांना दोन वेळ्चे जेवण धड नीट मिळत नाही ते काय शाळेत येणार?आणि शिवाय कसेबसे आलेच तर या महागाईच्या शिक्षणात जेथे मध्यमवर्गीय हैराण झाले तेथे काय तग धरणार?
त्यामुळे मुलांच्या घरचे त्यांना शाळेएवजी कामावर पाठवतात.यावर अशाच एका पालकाशी चर्चा केली असता त्याची प्रतिक्रिया अशी होती,"काय करणार शाळा शिकूण तो?नोकरीला थोडीचं लागणार आहे?आपल्याला काय परवडणार आहे का?मला आहे ३ मुलं आणि मी जातो १००-१५० रू रोजानी कामाला त्यात होणार आहे का हे सगळं?तो कामाला जातो तेवढाच घराला हातभार...."यावर विचार केला असता लक्षात आले की जेथे ३५ -४०% जनता दारिद्ररेषेखाली जगते तेथे अशी नाही मग कशी उत्तरे भेटणार?एकीकडे इंटरनॅशनल स्कूलच्या नावाखाली दरवर्षी लाखो रूपये खर्च करून आपल्या पाल्याचे हवे ते चोचले पुरविणारा एक वर्ग आणि दुसरीकडे अशी स्थिती! यातून शिक्षण हे फक्त एका ठराविक वर्गासाठी मर्यादीत होत चालले आहे.
पण ही कोणत्याही न्यूज चॅनलसाठी न्यूज ठरत नाही तर त्यांना फक्त सलमान-कॅटरिनाच्या प्रेमप्रकरणाची वृत्ते, आय.पी.ल.च्या मॅचेसची दृश्ये आणि खेळांडूचे पानचट वागणुकी किंवा सानिया-शोएब यांच्या लग्नात जेवायला काय काय पदार्थ बनविले आहेत याचे चोवीस तास लाइव्ह टेलिकास्ट करण्यात धन्यता वाटते.मायबाप सरकारबद्द्ल काय बोलायचे,एखाद्या मंत्र्याला याबद्द्ल विचारले असता कदाचित साहेबांच्या मनात विचार येइल,’माझा मुलगा अमुक अमुक इंटरनॅशनल स्कूल किंवा अमुक खाजगी शाळेत हायफाय शिक्षण घेतो. बाकींच्याचा करूया की नंतर विचार!’ यामुळे आपल्या मूळ समस्या अजूनही तशाच आहेत,हे आपले दुर्दैवच!!!