बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

महासत्ता होणार तरी कशी?

सध्या अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी ,तर युरोपची ४८ कोटी आहे. या लोकसंखेच्या निम्मे म्हणजे जवळपास २२ कोटी विदयार्थी भारतात आहेत. परंतु त्यापैकी केवळ २.६ कोटी म्हणजेच ११.८१ % विदयार्थीच महाविदयालयात जातात. उर्वरित १९ कोटी विदयार्थी महाविदयालयात जात नाहीत. ही एखाद्या खाजगी संस्थेच्या सर्व्हेतील आकडेवारी नसून खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी स्वतः एका अभियांत्रीकी महाविदयालयाच्या सुवर्ण पदक वितरण समारंभात सादर केलेली आकडेवारी आहे .

अशी परिस्थिती असताना भारत या तरूण पिढीच्या जोरावर महासत्ता बनणार तरी कसा ? आणि आर्थिकदृष्ट्या बनला तरी अशिक्षितांची महासत्ता म्हणून ओळखला जाईल का ? अशी महासत्ता आपल्याला अपेक्षित आहे का ?

या प्रश्नांना उत्तरे हवी असतील तर शासनाला आत्मपरीक्षण करणे गरजेचे ठरेल. सन २०२० पर्यंत ७ कोटींच्या घरात महाविदयालयीन विधार्थ्यांची संख्या नेण्यासाठी आजच्या ४५० विद्यापीठांची संख्या ७०० ते ८०० च्या घरात न्यावी लागेल. २२ हजार महाविदयालयांची संख्या ३५ ते ४० हजारांच्या घरात न्यावी लागणार आहे. मात्र हे करताना शिक्षणाची गुणवत्ता टिकविणे, हे प्रमुख आव्हान आहे. तसेच यासाठी शासनाची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे खाजगी क्षेत्राची शिक्षणातील गुंतवणूक वाढविणे अनिवार्य आहे. परंतु हे करताना शिक्षणाचे बाजारीकरण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे करताना जनता,विरोधी पक्ष,विविध शैक्षणिक , दलित नेते यांना बरोबर घेणे,हे शासनापुधील आव्हान आहे. शेवटी हा एक टीमवर्कचा भाग आहे ,यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?

सध्या जोतो आपल्या शिक्षणपद्धतीबद्दल वाटेल तसे बोलू लागला आहे ,हे बघून माझ्या मनात प्रश्न येतो की, खरच आपली शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता माझ्या वाचनात आले ते बिल गेट्स यानी आपल्या २००३ मधील भारत दौरयावर असताना या विषयी वक्त केलेले मत ज्यात ते म्हणतात की, ”Word’s best education system is Indian education system!” एकीकडे आपण आपल्या स्वत:च्या शिक्षणव्यवस्थेच्या नावाने खडे फ़ोडत असताना दुसरीकडे हे जगातील सर्वश्रीमत व्यक्तीचे मत ! याचा आपण विचार करायला हवा.
शेवटी नाण्याला दोन बाजू असतात कोणत्या बाजूने बघायचं हे आपल्यावर असत. आपली शिक्षणव्यवस्था इतकीही कामतून गेलेली नाही,पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत,हे मलाही मान्य आहे. त्यात काळानुरूप बदल होणे अपरिहार्य आहे.

विद्यार्थ्यांची मते !


शिक्षण व्यवस्थेबद्दल लोकमत व्रुत्तसमुहाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
९९% :- विद्यार्थ्यांच्या मते, रुढ शिक्षण पद्धतीत तात्काळ बदल करणे अत्यंत गरजेचे आहे.
७.७६% :- विद्यार्थ्यांना बदलांची भीती वाटते .
१६.५% :- विद्यार्थ्यांच्या मते, प्राध्यापकांना शिकवता येत नाही.
२३.३% :- विद्यार्थी म्हणतात लेक्चर्स अटेंड करायला ‘बोअर’ होत.
४१.६% :- विद्यार्थ्यांच्या मते , दोष ना आमचा,ना प्राध्यापकांचा, ‘सिस्टम’ च विचित्र आहे !
३६% :- विध्यार्थ्याना उनाडपणाचा आरोप मान्य आहे.
५५% :- विध्यार्थ्याना वाटते, आमचा आम्ही अभ्यास करू शकतो; तर लेक्चर्सला का बसायचे.
८६% :- विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेतील बदलांचे स्वागत करायला उत्सुक आहेत .
या सर्व अहवालाची आकडेवारी २००० विविध शाखेच्या, विविध ठिकाणांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून तयार करण्यात आलेली आहे.शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.

महाविद्यालयीन शिक्षण संस्कृतीचे की विकृतीचे?

कॉलेजला जायचे ते फक्त टाईमपास करण्यासाठी ! बाईकवरून धूम ठोकण्यासाठी !याची त्याची खेचण्यासाठी! कट्ट्यावर बसून अश्लील चाळे करण्यासाठी ! व्हँलेंटाइन डे धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी ! ही आजकालच्या एखाद्या टिपिकल कॉलेजच्या तरूणाची त्याच्या कॉलेज लाईफ बद्दलची मते.
अभियांत्रीकीचा विद्यार्थी असल्याने या शाखेशी संबंधीत एका सर्व्हेची आकडेवारी सादर करतांना मला अत्यंत दुःख होते . जी आकडेवारी असे दर्शविते की, ७०% अभियांत्रीकीचे विद्यार्थी सिगारेट ,दारू ,गुटखा यांसारख्या व्यसंनाच्या विळख्यात सापडलेले आहेत .याची कारणे जरी काहीही असतील ,तरी व्यसन हे कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही.
खरतर शिक्षण हे संस्कृती टिकविण्याचे माध्यम म्हणून ओळखले जाते,परंतु सध्याच्या तरूणाईने आपल्या वागणुकीतून ज्ञानमंदीरांचा अर्थच बदलून टाकलाय.याला वेळीच आळा घातला नाही तर ज्यांच्या जोरावर भारत महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे ,तेच देशाला दरिद्र्यात लोटायचे, असंस्कृतीच्या दारिद्रयात!

मुलगा झाला तर इंजीनियर, मुलगी झाली तर डॉक्टर!

थ्री इडियट सिनेमा मला वाटतं सर्वांनीच बघितला असेल ! प्रत्येकाला त्यातील कोणता ना कोणता डायलॉग लक्षात राहिला असेल .माझ्या आठवाणीत राहिलेला डायलॉग म्हणजे ," बेटा हुआ तो इंजीनियर, बेटी हुई तो डॉक्टर!" हा व्हायरसचा डायलॉग...
हा झाला एक गंमतीचा भाग परंतु आज या सिनेमातील वाक्याच्या निम्मित्ताने मला येथे प्रश्न उपस्थित करावसा वाटतो की, आज स्वातंत्र्याची साठी ओलांडलेल्या , जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या माझ्या देशात मुलांना त्यांच्या आवडीचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य नसावे का ? उद्याचा समाज हा काय फक्त डॉक्टर , इंजीनियर यांनीच बनणार आहे का ? या समाजाला चित्रकार , लेखक ,गायक ,खेळाडू यांची गरजच असणार नाही का ?
मुलांच्या आवडीनिवडी लक्षात न घेता केवळ ज्या क्षेत्रांतून जास्तीत जास्त पैसा कमविता येईल,अशी क्षेत्रे त्यांच्यावारती लादली जाताहेत . पैसा हेच सर्वस्व आहे हे त्यांच्यावर बिबंविण्यात येत आहे . परंतु या चुकीच्या अट्टहासामुळे मुलांची फरपड होत आहे . असाच विचार जर सचिन तेंडुलकर, शरद पवार ,लता मंगेशकर,एम् एफ हुसेन यांच्याबाबतीत झाला असता तर कदाचित आज या व्यक्ती यशाच्या शिकारावर नसत्या ! आणि इतक्या श्रीमंत देखील नसत्या !
अजूनही वेळ गेलेली नाही ,पालकांनी मुलांना करियर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. तसेच त्यांना त्या-त्या क्षेत्रात प्रोत्साहनही द्यावे . शेवटी पैसा हेच सर्वस्व नाही हे आपण मान्य करायला हवे . आवडीच्या कामात मिळणारा आनंद काही वेगळाच असतो . त्यातून आपण जगावर राज्य करू शकतो आणि राहिला प्रश्न पैशांचा तर तो आपण वर बघितलेल्या उदाहरणांवरून समजून घ्यायला हवा !

कळया उमलण्याआधीच का गळून पडताहेत ?


गेल्या एक - दीड महिन्यांपासून सतत विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेच्या बातम्या ऐकून अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की , समोर आयुष्याचा प्रचंड मोठा पट असतांना ,ज्यांना आयुष्य म्हणजे काय हे उमगलेले नसते ,अशा वयातील विद्यार्थी आत्महत्त्या का करत आहेत ? या सुंदर कळया उमलाण्याआधीच का गळून पडताहेत ?
तज्ञ्ज्ञांच्या मते ,अभ्यासाचे ओझे ,आई - वडिलांच्या अपेक्षा, शिक्षक, स्पर्धा ,परिक्षेतील अपयश ,सततचा ताणतणाव या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते .यांपैकी कोणताही एक घटक आत्महत्तेला १०० % जबाबदार असतो किंवा १०० % जबाबदार नसतो॰सततचा दबाब मुलांना आणि जर तो ते झुगारू शकले नाही के ते नैराश्येत लोटले जातात अणि त्यातून ते आत्महत्त्येचा विचार करतात.

आत्महत्तेचे हे लोण फक्त कॉलेजमधील तरूणांपुरते मर्यादीत न राहता पाचवी-सातवीतील चिमुकल्यांपर्यंत येउन पोचलेले आहे . यातच आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश दिसून येते . आजचे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी निश्चितच राहिलेले नाही . याला वेळीच आळा घातला नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील काळात आपल्यासमोर येतील.

यावर मार्ग काढण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे .यासाठी पुढील गोष्टींचा विचार करायला हवा.

१) पालकांनी ,शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केवळ मार्क्ससाठी दबाव टाकू नये.

२) मुलांना त्यांचे करियर निवडण्याचे स्वातंत्र्य असावे .

३) दोन विद्यार्थांमध्ये मार्क्सच्या आधारे तुलना होउ नये .

४) विद्यार्थ्यांमध्ये जिद्द ,सहकार्याची भावना , अपयश पचाविण्याची वृत्ती बिंबविणे गरजेचे आहे.

५) शासनाने आत्महत्त्या रोखण्यासाठी एक शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करावे.

६) विद्यार्थ्यानी न डगमगता परिस्थितीला तोंद द्यायला शिकावे .

७) अभ्यास ही एक ’एन्जॉएबल’ गोष्ट असायला हवी.

8) पैसा हेच सर्वस्व नाही हे सर्वांनी समजून घ्यायला हवे.

या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला तर कदाचीत उद्या हे आत्महत्त्यांचे लोण काही प्रमाणात का होईना कमी झालेले असेल.

शिक्षणालाही पार्टटाइम मंत्री !

२००९ च्या निवडणुकीनंतर शिक्षण कृषी ही दोन्ही महत्त्वाची खाती बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली . शिक्षणासारख्या महत्त्वाचे खाते एका कृषी खात्यातील तज्ञ्ज्ञ व्यक्तीकडे देण्याच्या निर्णयावरून शासनाची शिक्षणाबद्दलची उदासीनता दिसून येते.
एकीकडे शासन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचा टेंम्बा घेउन मिरवते आणि दुसरीकडे ही अशी अवस्था ! अशाने आपण शिक्षण क्षेत्रात प्रगती साधणार तरी कशी ?
थोरातांनी खात्याची सूत्रे स्वीकाराल्यापसून विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेचा विषय गाजतोय , ज्यांना शेतकरयांच्या आत्महत्तेची कारणे शोधता शोधता नाकी नउ आले ,ते विद्यार्थ्यांच्या आत्महत्तेला प्रतिबंध घालणार तरी कसे ? कृषी क्षेत्राची परिस्थिती बद्दल बोलायची तर सोय राहिलेली नाही, उद्या शिक्षणाची तशी अवस्था झाली तर नवल वाटायला नको !
शासनाने याची गंभीर दखल घ्यायला हावी अणि तात्काळ शिक्षण खात्याला स्वतंत्र मंत्री दयायाला हवा .जो केवळ राजकारणी नसून शिक्षण क्षेत्राचा त्याचा गाढ़ा अभ्यास असेल.











शिक्षणाचे बाजारीकरण

'साखरसम्राट ' या शब्दानंतर महाराष्ट्रात 'शिक्षणसम्राट' हा शब्द प्रचलित होवू लागला आहे .साखरसम्राटांनी ज्या प्रमाणे उस उत्पादक शेतकर्यांना वेठीस धरले, त्याप्रमाणे आज हे शिक्षणसम्राट सर्व जनतेला वेठीस धरत आहेत .एखाद्या व्यवसायाप्रमाणे या शिक्षणसम्राटांनी शिक्षणाची दुकाने उघडली आहेत.
भरमसाठ फी , डोनेशनच्या नावाखाली हे महाभाग जनतेला लूटत आहेत .केजी पासून पीजी पर्यंत यांचा धंदा पसरला आहे .काही ठिकाणी तर केजीच्या डोनेशननी ५०००० ची पातळी गाठली आहे .यामुळे शिक्षण केवल गरिबांनाच नव्हेतर मध्यमवर्गीयांना देखील न परवडणारे झालेले आहे आणि अशीच परिस्थिती राहिली ,तर ती फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होईल .
आत्महत्त्या करणारा शेतकरी असो ,३८०० रुपये पगारावर काम करणारा पोस्टमन असो किंवा अन्य कोणीही असो शिक्षणाच्या या बाजारीकरणाने पुरता हैराण झाला आहे.शासनाने या विरुध कड़क धोरण अवलंबिले पाहिजे,परंतु सरकारमधील मंत्र्याची वागणूक म्हणजे खाटकाचे दुकान खोलून शाकाहारी बनण्याचा प्रचार करण्यासारखे आहे, कारण बहुतेक शिक्षणसंस्था या मंत्र्यांच्याच आहेत .

ज्ञानकेंद्रीत की परिक्षाकेंद्रीत?

आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा करायची ठरल्यास , परिक्षेचा विषय निघाला नाहीतर नवलच ! आज कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला परिक्षेच्या चक्रव्यूहाने पुरते घेरले आहे . वर्षभरात कमीत कमी ५-१० वेळेस परिक्षेला सामोरे जायला लागेल, ही कोणत्याही विद्यार्थ्याने मनाशी जणू खूणगाठच बांधलेली आहे.
माझा प्रश्न असा आहे की ,इतक्या साऱ्या परिक्षांतून आपण साधत तरी काय आहोत ? परीक्षा येतात मुले रट्टा मारतात ,मार्क्स मिळवितात आणि कालांतराने सर्व विसरून जातात . अशा शिक्षणाचा फायदा तरी काय ? परीक्षेत गुण मिळविले म्हणजे काय जग जिंकले काय ? आपल्यासमोर अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जे शिक्षणाच्या परीक्षेत अपयशी ठरले असले, तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत मात्र बाजी मारली आहे. त्यामुळे परीक्षा हा काही गुणवत्तेचा मापदंड ठरू शकत नाही ,हे आपण लक्षात घ्यायल्या हवे.
खरतरं शिक्षण हे ज्ञान संपादीत करण्याचे साधन आहे , मात्र या परिक्षारूपी महाजालाने हे ज्ञान जखडून ठेवले आहे . परीक्षा असाव्यात परंतु त्यांची पद्धत आणि संख्या यात बदल करणे गरजेचे आहे. परीक्षा या जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्यासाठी उत्तेजीत करणाऱ्या ठराव्यात हीच एक विद्यार्थी म्हणून माझी अपेक्षा आहे.

सुसंवाद साधणे गरजेचे .....


परवाच महाराष्ट्र टाईम्समधील लेख वाचला ,ज्यात लिहले होते की ,आय.आय. टी. सारख्या उच्चाविभुषित शिक्षणसंस्थांमधे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील सुसंवाद कमी होत चाललाय.आय.आय. टी. ,आय.आय.एम. या केवळ भारतातीलच जगातील नामांकीत संस्था आहेत . तेथेच जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या संस्थांविषयी चर्चा न केलेलीच बरी !
खरतरं विद्यार्थी आणि प्राध्यापक हे शिक्षणरूपी गाडीची दोन चाके आहेत ,ज्याप्रमाणे गाडीतील दोन चाकांतील समन्वयाशिवाय गाडी मार्गक्रमण करू शकत नाही ,त्याप्रमाणे शिक्षणाची
ही गाडीदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील समंवयाशिवाय यशस्वी मार्गक्रमण करू शकत नाही
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील दिवसागणिक वाढणारी ही दरी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न आवश्यक आहेत .त्यांच्यामध्ये केवळ पुस्तक, डिग्री इतकेच संबंध न राहता मित्रत्त्वाचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे ........